Coronavirus : देशात ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची दुसरी लाट आता भारतामध्ये येण्याची शक्यता नाही. समजा आली तर ती म्हणावी तशी गंभीर स्वरुपाची राहणार नाही, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पण आगामी काळात कोरोनाच्या छोट्या स्वरुपाच्या लाटा येत राहातील, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 कोटी 31 हजार झाली असून त्यातील 95 लाख 80 हजार लोक बरे झाले आहेत. देशामध्ये सलग सातव्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या 30 हजारांपेक्षा कमी आहे. आता नवे रुग्ण आढळण्याचे व बळींची संख्या कमी झाली असून ही दिलासा देणारी बाब आहे.

याबाबत प्रसिद्ध विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. शाहिद जमील म्हणाले की, देशात नोंदविल्या गेलेल्या रुग्णांपेक्षा प्रत्यक्षात 16 पट अधिक आहेत, असे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे देशात खरे तर 16 कोटी रुग्ण आहेत, असे म्हणता येऊ शकते. इतके रुग्ण असल्याने व त्यांची प्रतिकारक्षमताही वाढल्याने संसर्गाची साखळी अनेक ठिकाणी तुटली आहे. त्यामुळे दुसरी लाट आलीच तरी फार गंभीर असणार नाही.

लस उत्पादकांना संरक्षण देण्याची मागणी
कोरोना लसीचे दुष्परिणाम झाल्याचा खोटा दावा करणारे लोक व त्यांनी दाखल केलेल्या खटल्यापासून लस उत्पादकांचे केंद्राने संरक्षण केले पाहिजे, अशी मागणी सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी केली आहे.

लंडनमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असून त्यामुळे नाताळच्या वेळेस बंधने शिथिल करण्याचा निर्णय पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रद्द केला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात होते तसेच कडक स्वरूपाचे लॉकडाऊन आता लागू केले आहे.