Coronavirus : दिलासादायक ! कोरोना संकटात देशात 40 दिवसांनंतर पहिल्यांदाच ‘हे’ घडलं, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांनंतर कोरोनाबाबत चांगली माहिती समोर येऊ लागली आहे. बाधितांची वाढणारी संख्या घटू लागल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गासाचे प्रमाण अधिक होते. मे महिन्याच्या सुरुवातीला दररोज चार लाखाहून अधिक बाधित देशात आढळत होते. मात्र पहिल्यांदाच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे आकडे कमी होत असून दिवसाला २ लाखांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान मृतांची आकडेवारीही वाढत होती त्यातही आता घट होऊ लागली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ९५ हजार ६८५ नवे रुग्ण आढळून आले. तर ३ लाख २६ हजार ६७१ जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बाधितांची संख्या वाढत असतानाच मृतांचाही आकडा वाढ चालला होता दररोज चार हजाराहून अधिक लोकांच्या मृत्यूची नोंद होत होती. आता हि संख्या साडेतीन हजारांच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३ हजार ४९६ जण दगावले आहेत. ३ मे नंतर प्रथमच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. दुसरीकडे नवीन रुग्णांपेक्षा कोरोनमुक्त होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या २६ लाखांच्या खाली
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार नव्या रुग्ण संख्येत घट होऊ लागल्याने सक्रिय रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. गेल्या २२ दिवसांपासून सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. ३ मे रोजी देशातील सक्रिय रुग्णांचं प्रमाण १७.१० टक्के होतं. आता ते १० टक्क्यांच्या खाली आलं आहे. गेल्या २ आठवड्यांत जवळपास १० लाखांनी सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २६ लाखांच्या खाली आहे.