Coronavirus : कळंबमध्ये एकाच कुटुंबातील 8 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, प्रचंड खळबळ

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाइन – कळंब शहरातील एका गर्भश्रीमंत कुटुंबातील 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या संपर्कात आलेले आणखी एका गर्भश्रीमंत कुटुंबाची माहिती घेऊन त्यांचेही नमुने घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर त्यांची दुकाने सील करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार अस्लम जमादार यांनी पोलिसनामा ऑनलाइनशी बोलताना दिली. दरम्यान, दोन्ही कुटुंबाच्या संपर्कात जवळपास 200 हुन अधिकजण संपर्कात आल्याची माहिती आहे. यामुळे कळंबकरांची धाकधूक वाढली आहे. तर दोन्ही कुटुंबिय माहिती लपवत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

एकही रुग्ण नसणाऱ्या कळंब शहरात पंधरा दिवसात 9 रुग्ण झाले आहेत. गेल्या काही दिवस पुणे, औरंगाबादसह परगावावरून अनेकजण आले होते. त्यातूनच कोरोना फैलाव झाला. दरम्यान ज्या व्यक्तीच्या हे सर्व लोक संपर्कात आले होते, ते कुटुंब आणखीही शहरात मुक्त संचार करत आहे ? असा सवाल समोर आला आहे.

एका महिलेला त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची चाचणी घेतल्यानंतर आता कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यात देखील एकदिवस उशिरा ही माहिती बाहेर आली. त्यानंतर पालिकेने परिसरात फवारणी केली. त्यानंतर हे कुटुंब एका लॉजवर राहिले. त्यातील 14 जणांचे रिपोर्ट काल आले. त्यात 7 जणांना लागण झाल्याचे रिपोर्ट आले आहेत. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आता प्रशासन त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती घेत आहे.

प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत दोन्ही कुटुंब सील केले असते तर धोका वाढला नसता, असे देखील आता नागरिक बोलू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनावर कळंबकर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

मुक्त वावर…

कोरोनाची लागण झालेल्या कुटुंबाचे दोन दुकान आणि काही व्यवसाय आहेत. त्याठिकाणी अनेक कामगार आहेत. त्यातील काहीजण थेट या कुटुंबाच्या संपर्कात आलेले आहेत. परंतु, त्यांनी दोनच कामगारांची माहिती दिली असल्याची चर्चा शहरात आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ त्या दोघांना क्वारंटाईन केले. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या कुटुंबाचे घर कुलूप बंद असताना दररोज हेच कामगार घर उघडून त्यातील साहित्य घेऊन जातात, त्यामुळे प्रशासन नेमके काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गर्भश्रीमंत असल्यानेच त्यांना सूट मिळत असल्याची चर्चा केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई करून या सर्वांना क्वारंटाईन करण्याची गरज असल्याचे नागरिक म्हणत आहेत.

दुसरे कुटुंब सील होणार

प्रथम ज्या महिलेला कोरोनाची लागण झाली ते कुटुंब मात्र बिंदास फिरत आहे. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात होते. तरीही प्रशासनाने त्यांची फक्त विचारपूस करून काही त्रास झाल्यास सांगा असे कळवले. पण त्यांना क्वारंटाईन केले नाही किंवा तो परिसर सील केला नाही. त्यामुळे या कुटुंबाने काल दिवसभर आपला व्यवसाय केला. त्यांचे शहरात अनेक दुकाने आहेत. त्याठिकाणी देखील कामगार आहेत. त्यामुळे शहरात धोका वाढला आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले सर्वांची माहिती काढली जात आहे. त्यांना क्वारंटाईन करून तपासणी केली जाणार आहे. त्यांचे दुकान सील केले जाणार आहेत. नागरिकांनी भीती बाळगू नये, तसेच मास्कचा वापर करून विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.

‘ते’ चालक गायब

रुग्णाला घेऊन गेलेले ते वाहन चालक गायब झाले आहेत. दोघेही जवळच्या खेड्यातील आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेणे आवश्यक असणार आहे. तर घरकामास असणाऱ्या महिला देखील असून, त्यांनाही क्वारंटाईन केलेले नाही. त्यामुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.