कोरोनासारख्या विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी मराठवाडा विद्यापीठात व्हायरॉलॉजी कोर्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक उद्योग डबघाईला आले पण याच कोरोनामुळे पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क निर्मितीसारखे स्टार्टअप उदयास आले आहेत. आज ते नफ्यातही आहेत. कोरोना संपुष्टात येईल की नाही, हे ठामपणे कोणी सांगू शकत नाही. देशातच नाही तर विदेशातही कोरोना नष्ट कसा होईल याच प्रयत्न सुरू आहे. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठात चालू शैक्षणिक वर्षांपासून व्हायरॉलॉजी हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. व्हायरॉलॉजी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असून या माध्यमातून प्रशिक्षित तज्ञ मनुष्यबळनिर्मिती केली जाणार आहे.

गेल्या वर्षी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या पुढाकारातून सीएसआर फंडातून विद्यापीठातील डीएनए बार कोडिंग सेंटरमध्ये कोरोना विषाणूची चाचणी प्रयोगशाळा सुरू झाली. त्यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संकल्प जाहीर केला होता की, विषाणुसंबंधी सखोल अभ्यासक्रम सुरू करून प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळनिर्मितीसाठी प्रयत्न केला जाईल. त्यानुसार विद्यापीठात ‘व्हायरॉलॉजी’ अभ्यासक्रम सुरू केला आहे.

नवीन अभ्यासक्रम विषयी बोलताना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपत दोन कोव्हीड टेस्टिंग लॅब सुरू केल्या. कोरोनासारख्या विषाणूचा सखोल अभ्यास व्हावा यासाठी विद्यापीठात ‘व्हायरॉलॉजी’ हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. यात केवळ माणसालाच नव्हे, तर प्राणी, वनस्पतींनाही बाधित करणाऱ्या विषाणुंचाही अभ्यास करणारे देशातील हे पहिले विद्यापीठ असणार आहे.

अद्ययावत प्रयोगशाळेत प्रशिक्षण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पाठविलेल्या अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाला ‘ग्रीन’ सिग्नल मिळाल्यानंतर तो प्रस्ताव विद्या परिषदेसमोर ठेवला.या अभ्यासक्रमाची पहिली बॅच १५ विद्यार्थ्यांची असेल. ‘डीएनए बार कोडिंग व कोरोना विषाणू चाचणी’ प्रयोगशाळेसाठी विद्यापीठ परिसरात स्वतंत्र इमारत उभारली जात आहे. त्यात ‘व्हायरॉलॉजी लॅब’ उभारली जाणार असून, अभ्यासक्रम तिथेेच शिकविला जाणार आहे. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी, तसेच प्रात्यक्षिक, विश्लेषण, संशोधनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठातील संबंधित तज्ज्ञ प्राध्यापक, तसेच काही बाहेरच्या तज्ज्ञांना पाचरण करण्यात येणार आहे.