ग्रामीण भागात ‘कोरोना’च्या ‘एन्ट्री’मुळे सामन्य ‘चिंताग्रस्त’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे संकट कमी होण्याऐवजी वाढत असल्याने सामान्यांच्या मनात अनेक प्रश्नांनी काहूर माजवले आहे. आतापर्यंत शहरातील पेठा आणि गर्दीच्या ठिकाणी कोरोनाबाधित आढळत होते. आता चक्क ग्रामीण भागात कोरोनाने एन्ट्री केल्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. त्यमुळे शेतामध्ये काम करण्यासाठी जावे की नाही, असाही प्रश्न अनेकांना सतावू लागला आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील लोणी काळभोर, उरुळी कांचन परिसरात कोरोनाबाधित आढळल्याने नागरिकांची घालमेल सुरू झाली आहे.

उरुळी कांचन येथील कोरोनाबाधित महिलेवर लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या 51 पैकी एका डॉक्टरसह दोन नर्स असे तिघेजण कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले आहे. त्यांना वेगळ्या इमारतीमध्ये, तर उर्वरित 45 जणांना रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर कोरोनटाइन केले आहे. तसेच कोरोनाबाधित नातेवाईकांची स्वतंत्र काळजी घेण्यात आली आहे, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

मागिल एक महिन्यापासून कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. 23 मार्चच्या रात्रीपासून देशभर लॉकडाऊन आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण लॉकडाऊनला तिलांजली देत आहेत. कोरोनाबाधित आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनचे नियम कडक करून कारवाई करणे हीच काळाची गरज आहे, अशीच भावना सामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.