खुशखबर ! ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका ‘कोरोना’ लसीला मोठं यश, तरुणांसह वृद्धांवरही ठरली प्रभावी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    एस्ट्राजेनेका (AstraZeneca Corona Vaccine) या कोरोनावरील लसीला मोठं यश मिळालं आहे. या कंपनीची लस वृद्धांमध्येही कोरोना व्हायरस (Covid-19) विरोधात लढण्यासाठी परिणामकारक ठरली आहे. या वृद्धांमध्ये इम्युन रिस्पॉन्स (Immune Response) विकसित करण्यासाठी ही लस यशस्वी ठरली आहे. एक इंग्रजी रिपोर्टनुसार, वृद्धांच्या शरीरात या लसीमुळं प्रोटेक्टीव अँटीबॉडीजचा विकास झाला आहे. या रिपोर्टमध्ये रिसर्चशी निगडीत असलेल्या 2 अज्ञातांचा हवालाही देण्यात आला आहे.

एस्ट्रजेनेका या कंपनीनं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांसह मिळून ही लस तयार केली आहे. या लसीची अ‍ॅडव्हान्स टेस्ट भारतात सुरू आहे. या लसीला भारतात कोविशिल्ड असं नाव देण्यात आलं आहे. सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियानं एस्ट्राजेनेकासोबत कोविशिल्ड लसीसाठी 100 कोटी डोसचा करार केला आहे. ऑक्सफर्डची लस आणि इम्युनोजेनिसिटीची माहिती जुलैमध्ये देण्यात आली होती. ब्लड टेस्ट रिपोर्टनुसार तेव्हा लस 18 ते 55 वर्षे वयोगटातील स्वयंसेवकांसाठी परिणामकारक ठरली होती.

एस्ट्राजेनेका कंपनीनं सुरक्षेच्या कारणास्तव सप्टेंबरमध्ये चाचणी थांबवली होती. त्यावेळी ब्रिटनमध्ये एक स्वयंसेवक आजारी पडल्यामुळं अमेरिकेसह अनेक ठिकाणी चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या.

कोरोनाच्या लसीच्या शर्यतीत अनेक कंपन्या आहेत. अशात आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेका यांनी मिळून तयार केलेली लस सगळ्यात पुढं आहे. विशेष म्हणजे ही कंपनी सावधगिरी बाळगून चाचणी करत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी आहे.

जगभरातील अनेक देशातील लोकांनी या लसीचे (Corona Vaccine) कोट्यावधी डोस विकत घेण्यासाठी व्यवहार केला आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला 3 महिन्यांच्या आत लस तयार केली जाण्याची शक्यता आहे. जगभरात अशा 9 लसी आहेत ज्या अ‍ॅडव्हान्स चाचणीत आहेत. यात फायजर, मॉडर्न आणि चीनी कंपनीच्या 5 लसींचा समावेश आहे.

सीरम इंस्टिट्युट कडून तयार केल्या जाणार 5 प्रकारच्या लसी

सीरम इंस्टिट्युट 2021-22 च्या शेवटापर्यंत जगभरासाठी एकूण 5 वेगवेगळ्या लसी तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. जवळपास 1 अब्ज डोस तयार केले जाणार आहेत. सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी याबाबत सांगितलं की, प्रत्येक तिमाहीत लस लाँच करण्याची आमची योजना आहे. कोविशिल्ड ( COVI-SHIELD) पासून या योजनेची सुरुवात होणार आहे. पुढील वर्षी ही लस यशस्वीरित्या तयार झालेली असेल.

ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड यनिव्हर्सिटीतील (University of Oxford) जेनर इंस्टिट्युटद्वारे कोविशिल्ड या लसीचा विकास करण्यात आला आहे. एक्सट्रजेनेका कंपनीकडून या लसीचं लायसन्स प्राप्त झालं आहे. भारतातील 1600 लोकांवर या लसीची शेवटच्या टप्प्यातील चाचणी होणार आहे. पुढील वर्षी ही लस लाँच होण्याची शक्यता आहे. जवळपास 2 ते 3 कोटी डोस तयार करण्याची सुरुवात झाली आहे. पुढं लसीचं उत्पादन वाढवून 7 ते 8 कोटी लसी तयार करण्यात येणार आहेत.