… तर तब्बल 500 कोरोना रूग्णांचा जीव गेला असता धोक्यात, पण ‘हा’ चमत्कार घडला

दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज देशात 2 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यातील आरोग्य यंत्रणा कोसळण्याच्या स्थितीत आहे. दरम्यान दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने तातडीने पुरवठा करण्याची विनंती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना केली. जीटीबी रुग्णालयात 500 रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहे. केवळ 4 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असल्याचे ट्विट जैन यांनी केले. अन् जैन यांच्या ट्विटनंतर काही तासाच्या आत ऑक्सिजनचे टॅंकर रुग्णालयाच्या दारात दाखल झाला. ऑक्सिजन वेळेत न पोहोचल्यास मोठा अनर्थ घडण्याची भीती होती.

उत्तर प्रदेशच्या मोदीनगरमधून 14 टन ऑक्सिजन घेऊन निघालेला टँकर पुढच्या काही तासात जीटीबी रुग्णालयाजवळ दाखल झाला. उत्तर प्रदेश पोलीस दलाचे 2 कर्मचारी देखील टँकरसोबत होते. ऑक्सिजनचा पोहोचण्यास उशीर झाला असता, तर अनेक रुग्णांचा जीव संकटात सापडला असता. मात्र ऑक्सिजन टँकर उपलब्ध होऊनही रुग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची तक्रार अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी केली. तुमच्या नातेवाईकाचा जीव वाचवायचा असल्यास स्वत: ऑक्सिजन सिलिंडर घेऊन या, असे रुग्णालयाचे कर्मचारी सांगत असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली. रुग्णालयाच्या डिस्प्ले बोर्डवर आयसीयू बेड अन् ऑक्सिजन बेडचा तपशील दिला आहे. मात्र तिथे दिलेल्या माहितीपेक्षा प्रत्यक्षातील स्थिती जास्त भीषण आहे. त्यामुळे रुग्ण अन् नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.