‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारचा निर्णय हॉटेल, रिसॉर्टसाठी नियमावली जाहीर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फॉर्म स्टे सुरू करण्याबाबत राज्याच्या पर्यटन संचालनालयाने ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत नियमावली जाहीर केली आहे. सर्व प्रवाशांची आगमनस्थळी थर्मल गनमार्फत तपासणी करावी, लक्षणे नसलेल्याच पर्यटक, प्रवाशांना प्रवेश द्यावा, इत्यादी नियमांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, राज्यातील कंटेन्मेंट झोनला यातून वगळण्यात आले आहे.

हॉटेल, लॉज, रिसॉर्ट इत्यादी शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास संमती देताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणे बंधनकारक असणार आहे. उदाहरणार्थ, अशा ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसारख्या बाबीसाठी प्रवाशाची माहिती प्रशासन, आरोग्य यंत्रणेला देण्याबाबत प्रवाशाची ना हरकत घ्यावी, मास्कचा वापर, सर्व आवश्यक ठिकाणी हँड सॅनिटायजर ठेवावेत, पैशांची हाताळणी करताना काळजी घ्यावी. डिजिटल माध्यमातून व्यवहाराला प्राधान्य द्यावे, इत्यादी नियमांचा अंतर्भाव आहे.

असे असतील नियम

1 नियमांची माहिती पर्यटकांना बुकलेट किंवा व्हिडीओच्या स्वरूपात द्यावी.

2 पर्यटकांनी त्यांच्या सामानाची स्वत: ने-आण करावी.

3 जास्त लिफ्ट असल्यास समोरासमोर संपर्क टाळण्यासाठी वर जाणे आणि खाली येण्यासाठी वेगवेगळ्या लिफ्टचा वापर करावा.

4 रुम सर्व्हिस संपर्कविरहित असावी. मागवलेली ऑर्डर रूमबाहेर ठेवावी.
लहान मुलांसाठीचे प्ले एरिया बंद ठेवावे.

5 हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटकांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांची प्रत्येक वेळी स्वच्छता करावी.

6 पर्यटकांची ट्रॅव्हल हिस्ट्री, हेल्थ हिस्ट्री आदीबाबतची माहिती असणारा आरोग्यविषयक अर्ज चेक-इन करण्यापूर्वी शक्यतो ऑनलाइन भरावा.

7 क्युआर कोडसारख्या प्रणालीतून स्वयं चेक-इनसारख्या बाबी सुरू करण्याचा प्रयत्न करावा.