कोरोना व्हायरस : ‘या’ 4 राज्यातील परिस्थिती चिंताजनक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरस संसर्गाचे एका दिवसात विक्रमी 9,987 रुग्ण आढळून आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संक्रमित लोकांची संख्या 2,66,598 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर एका दिवसात 266 लोकांच्या मृत्यूबरोबर मृतांची एकूण संख्या 7,466 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 1,29,917 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 1,29,214 रुग्ण निरोगी झाले आहेत तर एक व्यक्ती देशाबाहेर गेला आहे. या महामारीमुळे आतापर्यंत 7466 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने सांगितले की, “आतापर्यंत 48.47 टक्के लोक बरे झाले आहेत.” कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत 49 लाख, 16 हजार 116 नमुने चाचण्या देशात झाल्या आहेत. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिका, ब्राझील, रशिया आणि ब्रिटननंतर पाचव्या क्रमांकावर भारताला कोविड 19 चा सर्वाधिक फटका बसला आहे.

गेल्या 24 तासांत 266 मृत्यूंपैकी 109 जणांचा मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाला आहे. त्यानंतर दिल्लीत 62, गुजरातमध्ये 31, तामिळनाडूमध्ये 17, हरियाणामध्ये 11, पश्चिम बंगालमध्ये 9, उत्तर प्रदेशात 8, राजस्थानात 6, जम्मू-काश्मीरमध्ये 4, कर्नाटकात 3, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन तर बिहार आणि केरळमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि गुजरातमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. महाराष्ट्रातील आतापर्यंत 88,528 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 44384 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 40975 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 3169 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, तामिळनाडूमधील परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. या राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढून 33229 झाली आहे. यात 15416 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 17527 लोकांना सुट्टी देण्यात आली आहे. या राज्यात कोरोनामुळे 286 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत जवळपास 30 हजार प्रकरणे
दिल्लीत कोरोना संसर्गाची प्रकरणे जवळपास 30 हजारांच्या आसपास असून आतापर्यंत 29,943 प्रकरणे नोंदविली गेली आहेत. त्यातील 17712 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 11357 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. या साथीमुळे आतापर्यंत 874 लोकांचा बळी गेला आहे. कोरोना बाधित राज्यांच्या यादीत गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे. राज्यात आतापर्यंत 20545 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 5309 लोकांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 13956 रूग्ण बरे झाले. राज्यात कोरोना संसर्गामुळे 1280 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.