Coronavirus : देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा 2 लाखांच्या वर; गेल्या 24 तासात 25320 नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : देशभरात कोरोना कहर वाढत असून गेल्या काही दिवसांत दररोज नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी दिवसभरात २५ हजार ३२० नवीन रुग्ण देशभरात आढळून आले. त्यात एकट्या महाराष्ट्रातील १५ हजार ८०२ नवीन रुग्णांचा समावेश आहे. नव्या वर्षातील एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक नवीन रुग्ण आहेत. महाराष्ट्राच्या मानाने अन्य राज्यांची परिस्थिती बरी आहे. इतर राज्यांमध्ये दररोजी सापडणार्‍या नवीन रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आहे. हे पाहता महाराष्ट्राची स्थिती अतिशय बिकट दिसत आहे.

देशातील एकूण कोरोना रुग्णांची स्थिती १ कोटी १३ लाख ५९ हजार ४८ इतकी झाली आहे. त्यापैकी १ कोटी ९ लाख ८९ हजार ८९७ रुग्ण बरे झाले आहेत. असे असले तरी देशाभरातील सक्रीय रुग्णांची संख्या २ लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात २ लाख १० हजार ५४४ रुग्ण सक्रीय आहेत.

देशभरात लसीकरणाची मोहिम जोरात सुरु आहे. लसीकरण रविवारी ३ कोटी पार करण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत देशभरातील २ कोटी ९७ लाख ३८ हजार ४०९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.