Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 1077 नवीन पॉझिटिव्ह तर 11 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज दिवसभरात 1077 रुग्णांची कोरोनाची चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शहरामध्ये संक्रमित रुग्णांसोबत मृतांचा आकडा देखील वाढत आहे. आज दिवसभरात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 393 वर पोहचली आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 1077 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 हजार 431 एवढी झाली आहे. आज आढळून आलेल्या 1077 रुग्णांमध्ये 1034 रुग्ण शहरातील तर 43 रुग्ण शहराबाहेरील आहे. यांच्यासह 255 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 30 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 8 रुग्ण शहरातील आहेत तर 3 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 393 वर पोहचला आहे. यामध्ये 311 रुग्ण शहरातील तर 82 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 316 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 12 हजार 278 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 3142 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये भोसरी, पिंपरी, दापोडी, चिंचवड गाव, दिघी, खराळवाडी, निगडी, चाकण, पाषाण, शिरुर येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.