Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 373 नवे पॉझिटिव्ह तर 16 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अलिकडील काळात कमी होत असल्याचं समोर येणार्‍या आकडेवारीवरून स्पष्ट होतं आहे. मात्र, अद्यापही सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 373 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पुण्यातील 16 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 5 जणांचा आज दिवसभरात पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 4 हजार 227 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात 350 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 61 हजार 334 एवढी झाली आहे. सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 51 हजार 495 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 5 हजार 612 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 576 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 331 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.