मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवेसंदिवस वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधातील लढाईत पुढील 3 आठवडे अत्यंत निर्णायक असतील, तसेच यादरम्यान प्रत्येकालाच अत्यंत सावध रहावे लागेल, असा इशारा निती आयोगाचे सदस्य असे डॉ. व्ही. के पॉल यांनी दिला आहे. तसेच त्यांनी सर्व राज्यांना, अ‍ॅडव्हान्समध्ये 3 आठवड्यांचे नियोजन करण्यास सांगितले आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव अजयकुमार बल्ला, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल, आरोग्य सचिव राेजश भूषण यांनी मंगळवारी (दि. 20) एक उच्चस्तरीय महत्वपूर्ण बैठक घेतली. यात सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सहभागी झाले होते. त्यावेळी पॉल यांनी पुढील 3 आठवडे सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अजय कुमार भल्ला यांनी बाजारांमध्ये होत असलेली गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे.

दरम्यान आज सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लस तयार करणा-या कंपन्यांची बैठक घेणार आहेत. काल त्यांनी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील प्रमुखांशी चर्चा केली होती. याच बरोबर पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातील लढाईत औषध क्षेत्राच्या महत्वपूर्ण भूमिकेचेही कौतुकही केले होते. दरम्यान देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (दि. 20) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे.