Coronavirus : ‘कोरोना’ची लागण झालेल्या 9 महिन्याच्या ‘गर्भवती’ महिलेचा मृत्यू !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. नालासोपारा येथील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय नउ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर संबंधित गर्भवती महिलेला मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिला नऊ महिन्यांची गरोदर होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच मृत्यू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मुंबईत सोमवारी दिवसभरात 57 नवे रुग्ण आढळले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 490 वर गेला आहे. त्यापैकी 34 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 59 जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

तर अजून 150 संशयित रुग्ण दाखल आहेत. पुण्यातील रुग्णांच्या संख्येतही अचानक वाढ झाली असून सोमवारी एका दिवसात 37 नवे रुग्ण आढळले. मुंबई आणि पुण्यात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत असून वेगवेगळे परिसर प्रतिबंधित करण्यात येत आहेत. सोमवापर्यंत मुंबईत 226 परिसर प्रतिबंधित करण्यात आले.

अशा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये रुग्ण तपासणीसाठी विशेष दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. तुळशी वाडी ताडदेव, मालाड, शीव, शिवाजी नगर, देवनार अशा दहा ठिकाणी आणखी दवाखाने सुरू करण्यात आले. त्यात डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे पथक नेमण्यात आले आहे. आतापर्यंत जे रुग्ण सापडले त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठी पालिकेच्या आरोग्य पथकातर्फे 15 लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.