‘या’ कारणामुळे सोनियांचं नाव घेत अर्थमंत्र्यांनी थेट ‘हात’च जोडले (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडानमुळे सर्वाधिक हाल स्थलांतरित मजूर आणि कामगारांचे होत आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने लाखो मजूर, कामगार शहरं सोडून गावाकडे जाऊ लागले आहेत. या ज्वलंत प्रश्नावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर काम करण्याची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावरून राजकारण करू नये, अशी मी त्यांना हात जोडून विनंती करते, असे सीतारामन यांनी पत्रकार परिषेदत म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी शनिवारी स्थलांतरित मजुरांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावरूनही सितारामन यांनी टीका केली. राहुल ड्रामेबाजी करत असून त्यांनी मजुरांचा वेळ वाया घालवला, असे त्यांनी म्हटले.

स्थलांतरीत मजुरांच्या विषयाचं राजकारण करू नका, असे आवाहन विरोधकांना करताना त्यांनी म्हटले की, स्थलांतरित मजुरांच्या मुद्यावर एकत्र काम करण्याची गरज आहे. आम्ही सर्व राज्य सरकारांच्या सोबतीनं काम करत आहोत. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नी त्यांनी आपली जबाबदारी ओळखावी, असं मी त्यांना हात जोडून सांगू इच्छिते, अशा शब्दात सितारामन यांनी सोनिया गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.