Nitin Gadkari : कोरोनाच्या काळात Politics करू नका ! ‘राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही’ गडकरींनी नेते, कार्यकर्त्यांचे उपटले कान (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात राजकारण करु नका. प्रत्येक गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजेत असे नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या कामाचा बागलबुवा करु नका. एका गॅस सिलेंडर सोबत चारजण फोटो काढतात हे चांगले नाही. यातून आपल्याबद्दलचा लोकांमधील दृष्टीकोन बदलतो. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण हा खरा राजकारणाचा खरा अर्थ आहे, अशा शब्दात भाजप नेते नितीन गडकरी यांनी नेते आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले.

नागपूर भाजप पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. यावेळी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, केवळ निवडणुका जिंकणे आणि सत्तेत जाणे एवढा एक भाग नाही. अशावेळी गरिबांच्या मागे, समाजामागे, धर्म, पक्ष विरसरुन मदत करा. याचे फळ नक्कीच मिळेल. वाईट काळात केलेली मदत कधीच विसरली जात नाही. राजकीय विरोधक असलो तरी सर्वांच्या मागे उभे राहणे हे सामाजिक दायित्व आहे. मला कोरोना होत नाही अशा गाफील पणात काहीजण वावरत असतात. आजही काही नगरसेवक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी कोरोना काळात बेफिकीरपणे वागत आहेत. अति उत्साहीपणा न करता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

शक्यतो कोणाच्या घरी जाऊ नका. घरुनच काम करा. कार्यकर्त्यांना गमावणं हे पक्षाला परवडणारे नाही. आपला जीव वाचला तर पक्षाचं काम होईल. मी रोज सकाळी एक तास प्राणायाम करतो. यामुळे माझी प्रकृती ठीक आहे. माझी ऊर्जा वाढली, औषधामुळे प्रकृतीची काळजी घेऊन काम करतो, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले. कामाच्या काळजीने अनेक जण आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. मात्र आपले प्राधान्य हे आपलं आरोग्य, आपलं कुटुंब त्यानंतर पक्ष आणि समाजाचं काम असे असले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मला कोरोना होत नाही अशा भ्रमात कोणीही राहू नका. जे मला कोरोना होत नाही असे म्हणतात त्यांना कोरोना झाला आहे. लसीकरणासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:ची, घराची, कुटुंबाची, समाजाची काळजी घेतली पाहिजे. कोरोना काळात अनेक कार्यकर्त्यांना आपण गमावलं आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करा. जनतेमध्ये जनजागृती करा. मला एकदा कोरोना झाला म्हणजे दुसऱ्यांदा होत नाही अशा भ्रमात राहू नका. कारण पहिल्यांदा कोरोना झाल्यानंतर देखील दुसऱ्यांदा कोरोना झाल्याची उदाहरणे आहेत. अनेक औषधांचे साईड इफेक्टही पहायला मिळत असून गरिब रुग्णांना मदत करुन त्यांचे प्राण वाचवा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना केले.