नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसबाबत भारत सरकारने काही महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. राज्यातही कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारनं कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. 22 मार्चपासून पुढील एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असे पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांना घरातच रहावे, यासंदर्भात राज्य सरकारांनी निर्देश जारी करावेत अशी सूचना भारत सरकारने केली आहे.
Covid – 19 संदर्भात नवीन सूचना जाहीर
1. 22 मार्चपासून एक आठवडा कोणतेही नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान भारतात येण्यास परवानगी नाही.
2. राज्य सरकारने अधिसूचना काढून 65 वर्षावरील व्यक्तींनी वैद्यकीय कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असा सल्ला द्यावा.
3. त्याचप्रमाणे 10 वर्षाखालील मुला-मुलींना घराबाहेर पडू देऊ नये.
4. रेल्वे आणि हवाई वाहतूक विभागाने सर्व प्रकारच्या प्रवासी सवलती रद्द कराव्यात. यामधून विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांगांना वगळावे
5. राज्य सरकारांनी खासगी क्षेत्राला घरून काम करण्याची मुभा द्यावी.
6. गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याआड व वेगवेगळ्या वेळांमध्ये कार्यालयात हजर राहण्याची सूचना.
केंद्र सरकारने दिलेल्या या सूचना फक्त कोरोना प्रभावीत राज्यांसाठीच नाहीत तर देशातील सर्व राज्यांना लागू करण्याचा निर्णय केंद्राचा आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयाकडून संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय नसल्याचं सांगण्यात येत आहे.