Coronavirus : ‘काम करताना किंचाळण्याची गरज नसते, शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची वाढती संख्या सरकारची चिंता वाढवत आहे. पुण्यात एका दिवसात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील परिस्थितीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे. या पत्रातून त्यांनी अनेक मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहे. एकिकडे मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक होत असताना दुसरीकडे विरोधक मुख्यमंत्र्यांना लक्ष करत आहेत. राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यात कमी पडत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. विरोधकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर देताना विरोधकांवर टीका केली आहे.

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारला टोला लगावला होता. देशाच्या तुलनेत 50 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. परंतु तरीही आपण म्हणायचं महाराष्ट्र सरकार चांगल काम करतय असं ट्विट करत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला होता. राणेंच्या या टोल्याला उत्तर देताना रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी सातत्याने संवाद साधत आहेत. तसेच, उध्दव ठाकरेंच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचे सोशल मीडियातून कौतुक करण्यात येत आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी उद्धव ठाकरेंच जाहीर कौतुक केले होते. तर जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. यावरून रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरच्या माध्यमातून टार्गेट केले आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करून विरोधकांवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडक भूमिका घेत नसल्याचं काही लोक म्हणतात, पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते. शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येत असेल आणि महाविकास आघाडीचे नेतेही खंबीर साथ देत असतील, तर उगाच घसा फोडण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटलेला कधीही चांगला, अशा शब्दात रोहित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like