Coronavirus : ‘कोरोना’च्या महासंकटात कुणीही राजकारणाचा ‘डमरू’ वाजवू नये, नितीन गडकरींचा ‘टोला’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या देशात कोरोनाचे संकट असताना कुठल्याही प्रकरणाचे राजकारण आत्ता करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे तसेच आत्ताच्या घडीला राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला अधिक महत्व देणे गरजेचं आहे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

गडकरी यांनी कोरोनाकाळात चाललेल्या संकटकाळात ज्या राजकीय कुरघोडी चाललेल्या आहेत त्यावर साफ नाराजी व्यक्त केली , या काळात जनतेच्या गरजांना महत्व देणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. या कठीण काळात कोणीही राजकारण करून खालच्या थराला जाऊ नये तसेच या परिस्थितीचा राजकारणासाठी उपयोग करून आपली डाळ शिजवणं थांबवावं . अशा कडव्या शब्दात नितीन गडकरी यांनी स्वतःच्याच पक्षातील काही नेत्यांच्या कानपिचक्या घेतल्या. तसेच नितीन गडकरी म्हणाले मलादेखील अनेकदा महाराष्ट्र सरकारच्या काही बाबी पटत नाही पण तेव्हा मी स्वतः त्यावेळी मुख्यामंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सचिवांशी त्याबाबत चर्चा करतो. माणूस आहे त्यामुळे माणसाकडून चुका या होतात. अशा परिस्थितीत राजकारण करण्यापेक्षा त्यावर मार्ग काढणे जास्त गरजेचे आहे. कोरोनाचे संकट संपल्यावर करा किती करायचे ते एकमेकांवर राजकारण. असे म्हणत नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या पक्षातील काही नेत्यावर टीका केली.

अतिशय स्पष्टवक्ते पण अशी ओळख असलेले नितीन गडकरी नेहमी त्यांच्या स्पष्ट आणि परखड बोलण्यामुळे नेहमीच प्रकाशझोतात असतात. प्रसंगी आपल्याच पक्षातील नेत्यांच्या चुकांवर स्पष्ट्पणे उघड टीकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गडकरी यांच्या वक्तव्यांना तसेच सल्यांना विशेष असे महत्व दिले जाते.

सद्यस्तिथीतील उद्योग धंद्यांविषयी बोलताना गडकरी म्हणाले कोरोनाकाळात लघु उद्योगांना चांगलाच फटका बसला आहे . या लघु उद्योगामध्ये ११ कोटी कामगार काम करतात म्हणूनच ४०० क्लस्टर मध्ये सध्या लघु उद्योग क्षेत्रासाठी आराखडा आखण्याचे जोमाने काम चालू असल्याचे गडकरी यांनी सांगितले