राज्यात एकही ‘कोरोना’ग्रस्त नाही, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंबंधित विधानपरिषदेत आज निवेदन केले. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून वैद्यकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज आहेत, राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. कोरोनाच्या संशयितांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दहा खाटा स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये 3 ठिकाणी केंद्र उभारण्यात आली आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना ग्रस्तांवर उपचार करण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, कोरोनाचे मूळ प्राणीजन्य पदार्थांमध्ये आहे, कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अडीच ते तीन टक्क्यांदरम्यान आहे. लक्षणं ओळखून वेळीच योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. हात रुमाल वापरणंही पुरेसं आहे. घाबरुन जाण्याची गरज नाही. यापुढे ते म्हणाले, एन – 95 हे मास्क फक्त रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. सर्वसामान्यांना त्याची गरज नाही.

मुंबई महापालिका सज्ज –
कोरोना व्हायरसच्या संभाव्य संकटाचा सामना करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी उद्या विशेष बैठक बोलावली आहे. आरोग्य अधिकारी, महापालिका रुग्णालयांचे अधिष्ठता, खासगी रुग्णालयातील अधिकारी यांना बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाची तयारी आणि उपाययोजना यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

दिल्लीत कोरोनाचा शिरकाव –
दिल्लीत कोरोनाचे काही संशयित रुग्ण आढळल्याने आता सतर्कता बागळण्यास सुरुवात झाली आहे. नोएडातील अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नोएडातील 6 संशयित लोकांचे सॅम्पल घेण्यात आले होते, परंतु ते निगेटिव्ह निघाले. परंतु या सर्वांना पुढचे 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. लक्षणं विकासित होताना दिसली तर त्यांची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात येईल.