कोरोनातून बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनी घेता येणार लस; केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार, लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. पण या लसीवरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लस केव्हा घ्यावी असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. त्यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर आता तुम्ही 3 महिन्यानंतर लस टोचून घेऊ शकता.

‘नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19’ (NEGVAC)ने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. NEGVAC ने केलेल्या सूचनांमध्ये एखादा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यावर त्याला तीन महिन्यांनी कोरोना लस द्यावी, असे सांगण्यात आले होते. त्यांच्या या सूचनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. NEGVAC ने केलेल्या सूचनानंतर एखाद्या व्यक्तीला कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला, तर त्याने कोरोनातून बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा.

स्तनपान करणाऱ्या महिलांनाही लस

आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोरोनाची लस दिली जावी असे NEGVAC ने म्हटले आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या लोकांची एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

आयसीयूमधून बरे झालेल्या रुग्णाने…

जर गंभीर आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती आयसीयूमध्ये अॅडमिट असेल तर बरे झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यानंतर लस घेऊ शकते. एक व्यक्ती लस घेतल्यानंतर 14 दिवसानंतर रक्तदानही करू शकते. तसेच कोरोनाबाधित रुग्ण RT-PCR टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच्या 14 दिवसानंतर रक्तदान करू शकतात.