‘कोरोना’ची अशीही दहशत ! वॉशिंग मशीनमध्ये धुतले 14 लाख रूपये अन् नंतर ओव्हन मध्ये सुखवले

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूने भारतासह जगातील बर्‍याच देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. या साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या आव्हानांना व धोक्याला टाळण्यासाठी लोक अत्यंत काळजी घेत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या भीतीने एका व्यक्तीने वॉशिंग मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात नोटा धुवून घेतल्याची घटना समोर आली आहे.

ही बाब दक्षिण कोरियाची आहे. स्थानिक मीडियाच्या म्हणण्यानुसार दक्षिण कोरियामधील सियोलजवळील अंसन शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीने कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपले सर्व पैसे वॉशिंग मशीनमध्ये धुतले. त्याने वॉशिंग मशीनमध्ये सुमारे 14 लाख रुपये टाकले होते. त्यानंतर त्याने त्यांना वाळविण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवले, ज्यामुळे बर्‍याच नोटा जळाल्या.

त्या व्यक्तीची नोटा निर्जंतुकीकरण करण्याची पद्धत पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की हे नुकसान मोठे आहे. त्यांचे म्हणणे आहे की बहुतेक नोटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर या नोटा बदलता येतील की नाही हे जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीने बँक ऑफ कोरियाला भेट दिली. बँक ऑफ कोरियाने सांगितले की खराब झालेल्या आणि फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण नियमांनुसार केली जाऊ शकते. त्यानंतर बँक ऑफ कोरियाने त्या व्यक्तीला नियमांनुसार 23 मिलियन डॉलर्स चे नवीन चलन मंजूर केले.

बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या तरूणाच्या काही नोटांना आम्ही त्या बदलू शकलो नाही कारण त्या खूप खराब झाल्या होत्या, उर्वरित नोटा नियमांनुसार बँकेने बदलून दिल्या आहेत. बँक अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की अशा प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीला बँकेकडून किती पैसे मिळतील ते किती प्रमाणात नुकसान झाले आहे यावर अवलंबून असते. तोटा कमी झाल्यास बँक नवीन चलन प्रदान करू शकते. गोपनीयतेच्या कायद्यामुळे बँक अधिकार्‍यांनी या कुटुंबाबाबत कोणतीही वैयक्तिक माहिती दिली नाही. सध्या तरूणाची पैसे निर्जंतुकीकरण करण्याची पद्धत चर्चेचा विषय बनली आहे.