Coronavirus : आता व्हेंटीलेटरवरील कोरोना रुग्णाला रेमडिसिविर नाही? राज्य शासनाच्या टास्क फोर्सची सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनामुळे प्रकृती खालावल्याने व्हेंटीलेटर सपोर्ट देण्यात आलेल्या रुग्णावर रेमडिसिविर इंजेक्शनचा उपयोग होत नसल्याचा निष्कर्षाप्रत राज्य शासनाचे टास्कफोर्स पोहोचले आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या एक-दोन दिवसांत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडिसिविर इंजेक्शनचा वापर करण्यासाठी नवीन गाईडलाईन्स जाहीर करण्याची शक्यता असल्याचे मत आरोग्य विभागच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे.

देशभरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला आहे. या लाटेमध्ये संसर्गाचा वेग वाढला असून युवावर्गाही कोरोनाला बळी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्णसंख्या वाढत असताना गंभीररुग्ण आणि मृतांची संख्या धक्कादायकरित्या वाढत आहे. गंभीररुग्ण वाढल्याने बहुतांश डॉक्टरांकडून उपचारासाठी ‘रेमडिसिविर’ इंजेक्शनचा वापर होत आहे. अचानकच रेमडिसिविर इंजेक्शनची मागणी वाढली असताना उत्पादन आणि पुरवठ्यावर मर्यादा असल्याने देशातील जवळपास सर्वच शहरांत ‘रेमडिसिविर’ च्या शोधासाठी रुग्णांचे नातेवाईक प्रचंड धावपळ करत आहेत. पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक असल्याने काळाबाजार करणार्‍यांची संख्याही वाढली असून ‘रेमडिसिविर’ हा आता राजकिय मुद्दा ठरत आहे.

राज्य शासनाने कोरोना विरोधातील लढ्यासाठी स्थापन केलेल्या टास्कफोर्सने शनिवारी राज्यातील महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महत्वाच्या विभागांच्या सचिवांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीमध्ये रेमडिसिविरचा वापर कोणत्या स्थितीत करावा, कोणत्या रुग्णांना हे इंजेक्शन द्यावे, इंजेक्शनची उपयुक्तता आदीवर विस्तृत चर्चा झाली. टास्क फोर्सनेही आयसीएमआरच्या गाईडलाइन्स व रेमडिसिविर इंजेक्शन देण्यात आलेल्या रुणांचा अभ्यास या बैठकीत सादर केला. सर्वंकष चर्चेनंतरच टास्क फोर्सने शासनाला काही सूचना केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोरोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णाला पहिल्या आठ दिवसांत ऑक्सीजन सॅच्युरेशन हे ९२ पेक्षा कमी असेल, रुग्णाला सतत ताप असेल आणि एचआरसीटी स्कोअर हा १० ते १२ च्या आतमध्ये असेल अशाच रुग्णाला हे देणे योग्य ठरणार आहे. एचआरसीटी स्कोअर हा १० ते १२ च्या पुढे गेल्यास किंवा रुग्ण व्हेंटीलेटरवर असल्यास त्याला रेमडिसिविर इंजेेक्शन देण्यात येउ नये, अशा सूचना केल्या आहेत. राज्य शासनाकडून येत्या एक दोन दिवसांत या सूचनांच्या आधारे रेमडिसिविर इंजेक्शन देण्याबाबत नव्याने गाईडलाईन काढण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍याने दिली.