Coronavirus : देशात ‘कोरोना’बधितांचा आकडा 26 लाखांच्या टप्प्यात, 24 तासात 63490 नवे पॉझिटिव्ह !

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांचा आकडा दररोज नवीन रेकॉर्ड बनवत आहे. शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 26 लाखांच्या जवळ पोहचली. मागील 24 तासात कोरोनाची 63 हजार 490 नवी प्रकरणे समोर आली, तर 944 लोकांचा मृत्यू झाला आहे. नव्या केस आल्यानंतर देशात एकुण रूग्णांची संख्या 25 लाख 89 हजार 682 झाली आहे. शुक्रवारी कोरोनाची 65,002 प्रकरणे समोर आली होती, तर 996 रूग्णांचा मृत्यू झाला होता.

आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या 6 लाख 77 हजार 444 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 49 हजार 980 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 18 लाख 62 हजार 258 लोक बरे झाले आहेत. देशात सर्वात जास्त प्रभावित महाराष्ट्र असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात शनिवारी कोविड-19 ची 12,614 नवी प्रकरणे समोर आली, तर आणखी 322 लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागानुसार राज्यात कोरोना व्हायरस संक्रमणाच्या 12,614 नव्या प्रकरणांसह या महमारीच्या एकुण प्रकरणांची संख्या 5,84,754 झाली आहे. याशिवाय आणखी 322 लोकांच्या मृत्यूसह मृतांची एकुण संख्या वाढून आता 19,749 झाली आहे. मुंबई शहरात शनिवारी 1,254 प्रकरणे समोर आली, तर 48 लोकांचा मृत्यू झाला.