Coronavirus : अहमदनगरमध्ये ‘कोरोना’चा दुसरा बळी, कोपरगावातील 60 वर्षाच्या महिलेचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई, पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असताना आता राज्यातील इतर छोट्या मोठ्या शहरात ,गावात देखील कोरोना दाखल झाला आहे. अहमदनगर येथील कोपरगावच्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना आज पहाटे घडली असून या महिलेचे वय ६० वर्षे होते. या महिलेवर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या महिलेच्या मृत्यूने अहमदनगरात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, या महिलेला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने कोपरगाव येथून जिल्हा रुग्णालयात आणले होते. तिच्या घशातील स्त्राव नमुना घेऊन ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल १० एप्रिलला प्राप्त झाला, त्यात ही महिला ‘करोना’बाधित असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर बूथ हॉस्पिटलच्या ‘आयसोलेशन वार्ड’मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती विषयक तक्रार असल्याने तिला अधिक तपासणीसाठी ११ एप्रिलला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथेच या महिलेवर उपचार सुरू होते. मात्र, ‘करोना’शी झुंज देत असलेल्या या महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला आहे.

अहमदनगर मध्ये कोरोनामुळे मृतांची संख्या २ वर

यापूर्वी १० एप्रिलला श्रीरामपूरच्या ‘करोना’बाधित २७ वर्षीय तरुणाचा पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या तरुणाला ‘करोना’ची बाधा झाल्याचे पुणे येथेच समोर आले होते, व त्यानंतर त्याच्यावर तेथेच उपचार सुरू होते. कोपरगाव येथील महिलेचा मृत्यु झाल्यामुळे नगर जिल्ह्यातील ‘करोना’मुळे मृत्यु झालेल्यांची संख्या दोन झाली आहे.

प्रशासन सतर्क

दरम्यान कोरोनामुळे आज दुसरा मृत्यू झाल्यामुळे अहमदनगर यथे प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंकरिताच तसेच तातडीची गरज भासल्यासच घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच वारंवार नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.