Coronavirus : उस्मानाबाद : 19 प्रभागांमध्ये समित्यांचे गठण – नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना विषाणूचा संसर्ग उस्मानाबाद शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून शहरामधील 19 प्रभागांमध्ये प्रभागनिहाय समित्यांचे गठण करण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्ष त्या-त्या प्रभागातील पुरूष नगरसेवक व सचिव त्या प्रभागातील स्त्री नगरसेवक असुन त्यांच्या सोबत नगर पालिकेतील सर्व विभागातील 10 कर्मचारी , 1 अध्यक्ष 1एक सचिव असे मिळून 12 सदस्यांचा प्रत्येक समितीमध्ये समावेश असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली.

समित्याद्वारे संपूर्ण शहरामध्ये घरोघरी जाऊन ऑक्सिमीटर व थर्मामीटर द्वारे दर चार-पाच दिवसांनी प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी करण्यासाठी प्रत्येक समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे 20 ऑक्सिमीटर व 20 थर्मामीटर, सॅनिटायजर, मास्क, हॅन्डग्लोज , फेससिल्ड याप्रमाणे अवश्यकतेनुसार लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पुढील काळामध्ये कोव्हिड-19 संदर्भात नगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणार्‍या विविध उपायोजना या स्थापन केलेल्या समित्याद्वारे राबवण्यात येणार आहे. अशा पध्दतीने काम करून नगर पालिका कोव्हिड-19 ला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार आहे, समितीला सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगर पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी केले आहे.