Coronavirus : कोरोनानं थैमान घातलं असताना तुळजाभवानी मंदिराबाबत ‘गंभीर’ प्रकार समोर

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे, जगभरात या व्हायरसला रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तुळजाभवानी मंदिर प्रशासन मात्र कोरोना रोखण्यासाठी उदासीन असल्याचे दिसते आहे.

तुळजाभवानी मंदिरात फक्त 2 तासाला स्वच्छता करण्याचे आदेश देऊन मंदिर प्रशासन निवांत झाले आहे. या मंदिर परिसरात ना की आजारासंबंधित कोणतेही जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत ना की कुठल्याही वैद्यकीय सुविधा उभारण्यात आल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना जे मास्क देणे आवश्यक आहे ते देखील देण्यात आलेले नाही. त्यामुळे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक भीतीच्या छायेत आहेत.

राज्य शासनाने कोरोनाचा बिमोड करावा यासाठी सगळ्या उपाय योजना करा असे आदेश देण्यात आले असले तरी मंदिर प्रशासन सुस्त असल्याने मंदिरात येणारे भाविक नाराज आहेत. तसेच याबाबत भीती व्यक्त करत आहेत.

तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला फक्त राज्यातीलच नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांसह अनेक भागातील लोक दर्शनला येतात. त्यामुळे याबाबत लवकर उपाय योजना करणे गरजेचे आहे. मंदिर व्यवस्थापक मात्र या सर्व बाबी करण्यात येतील असे आश्वासन देत आहेत. त्यामुळे आगामी काळात याबाबत काही निर्णय होतो का हे पाहावे लागेल.

दुसरीकडे, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैद्यनाथ मंदिरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत आहे. दररोज या मंदिरात परराज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात, त्यामुळेच या भविकांनी मंदिरात प्रवेश करताना तोंडाला मास्क किंवा स्कार्फ बांधून गाभाऱ्यात प्रवेश करावा असे आवाहान मंदिर ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांनी या सूचना दिल्या आहेत.