Coronavirus : मोठा दिलासा ! सांगलीतील 26 रूग्णांपैकी 22 जण झाले ‘कोरोना’मुक्त

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन – सांगली जिल्ह्यात इस्लामपुरातील एकाच कुटुंबातील तब्बल २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याने एकाच खळबळ उडाली होती. सोमवारी यात आणखी एका रुग्णाची वाढ होऊन हा आकडा २६ वर पोहोचला होता मात्र मागील सतरा दिवसांपासून सुरु असलेल्या आरोग्य विभागाच्या लढाईनंतर यातील २२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता सांगली जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला मोठं यश मिळलं आहे. याबाबतची माहिती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इस्लामपूर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

२६ रुग्णांपैकी २२ रुग्ण कोरोनमुक्त

याबाबत माहिती देताना जयंत पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हण्टले आहे की, ” तुम्हा सर्वांना सांगण्यात आनंद होतोय की सांगलीतील २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण आता कोरोनामुक्त झालेत. आपण कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतोय. जिल्ह्यात २६ रुग्ण आढळल्याने पालकमंत्री व इस्लामपूर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून दुहेरी दडपणात होतो, मात्र आता दिलासा मिळाला” , असे सांगत २२ रुग्ण कोरोनमुक्त झाल्याची आनंदाची बातमी पाटील यांनी दिली आहे.

आज मी काहीसा चिंतामुक्त

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करीत असताना कोरोनाच्या २२ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर जयंत पाटील यांनी चिंतामुक्त झाल्याचे म्हंटले आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, ” आज मी काहीसा चिंतामुक्त झालोय! माझ्या इस्लामपूर मतदारसंघातील जे कुटुंब कोरोनाबाधित झाले होते ते आज पूर्णपणे कोरोनामुक्त झालंय. सांगली जिल्ह्यामध्ये यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची मला खात्री आहे. पण अद्यापही लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे”

सांगलीकरांचे कौतुक

पुढे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की,” सांगलीच्या जनतेने दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. नागरिकांनी विलगीकरणाचा राबवलेला प्रयोग १०० टक्के यशस्वी केल्याने आपण यावर मात करू शकलो. पण गाफील राहू नका. माझी महाराष्ट्रातील जनतेस विनंती आहे, शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करा तर आणि तरच आपण या रोगावर विजय मिळवू शकू”

सांगलीत आसा झाला कोरोनाचा फैलाव

दरम्यान, प्रारंभी जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नव्हता. या परिस्थितीत इस्लामपुरातील एका कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे २३ मार्चला स्पष्ट झाले होते. संबंधित रुग्ण सौदी अरेबियामधील उमरा येथून आले होते. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह संपर्कात असलेल्यांना त्रास होवू लागल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर कुटुंबातील बहुतांशी सदस्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. एकाच कुटुंबातील तब्बल २५ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. या सर्वांवर मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र सोमवारी पुन्हा इस्लामपुरातील त्या कुटुंबाच्या संपर्कात असलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते, त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २६ वर पोहोचली होती. आता मात्र २२ रुग्ण कोरोनमुक्त झाल्याने सांगलीकरांकरिता ही दिलासादायक बातमी आहे.