Coronavirus : मुंबईत एका दिवसात 875 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोनाचा हैदोस सुरुच असून कम्युनिटी संसर्गामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढत असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत काल एकाच दिवशी 875 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सरकारी यंत्रणांची झोप उडाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 13 हजार 564 वर पोहोचली आहे. रविवारी 19 करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 508 झाली आहे.

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 625 संशयित रुग्णांना रविवारी निरनिराळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत रुग्णालयात दाखल केलेल्या संशयितांची संख्या 15 हजार 26 झाली आहे. रविवारी दिवसभरात 19 करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यात 10 पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश आहे. मृतांपैकी 13 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. रविवारी 212 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत बरे होऊन रुग्णालयातून घरी गेलेल्यांची संख्या तीन हजार चार झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालय क्षेत्रातील धारावी, दादर आणि माहीम परिसरातील एकूण 1 हजार 87 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंत या तिन्ही ठिकाणच्या 42 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत कोरोनाने धुमाकूळ घातला असून रविवारी आणखी 26 जणांना बाधा झाली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 859 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 29 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. धारावीमधील 222 करोनाबाधित बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. माहीममध्ये सात, तर दादरमध्ये दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी उघडकीस आले. त्यामुळे माहीम आणि दादर येथील कोरोनाबाधितांची संख्या अनुक्रमे 119 आणि 109 वर पोहोचली आहे.