अरे देवा ! एकाच कुटुंबातील 13 जणांना ‘कोरोना’

मेरठ : वृत्तसंस्था – जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचे भारतात एक हजारांहून अधिक रुग्ण झाले आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एकाच कुटुंबातील ८ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. तर, या पूर्वी याच कुटुंबातील ५ जणांना लागण संसर्ग झाला होता. त्यामुळे एकाच घरातील १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मेरठ मध्ये रविवारी ८ नवे रुग्ण आढळले असून,त्यांची संख्या १३ झाली आहे. कोरोनाची लागण झालेले हे सर्व १३ जण एकाच कुटुंबातील आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. कारण देखरेखेखाली असलेल्या ४६ जणांपैकी केवळ ११ जणांचीच तपासणी होऊ शकलेली आहे. अजून ३५ जणांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

मेरठ मध्ये काही दिवसांमध्ये रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे. रुग्णांच्या संख्येत अजून वाढ होऊ शकते असे, डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर महाराष्ट्रातील अमरावती मधील एक व्यक्ती मेरठ मध्ये आपल्या सासुरवाडीत आला होता. त्यांनतर त्याची पत्नी आणि नातेवाईकांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

सदरील व्यक्ती अमरावतीमधील खुर्जा येथे मातीची भांडी विकण्याचे काम करते. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनाने शास्त्री नगर, शराब गेट परिसरात नाकेबंदी केली आहे. तर दुसरीकडे या व्यक्तीच्या आणि नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या ३५ जणांना होम क्वारंटाइन वॉर्डात दाखल केले आहे.