Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे विक्रमी 67 हजार नवे पॉझिटिव्ह तर 942 जणांचा मृत्यू, बाधितांचा आकडा 24 लाख

नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांचा आकडा वाढून 23 लाख 96 हजार 638 झाला आहे. मागील 24 तासात विक्रमी 66 हजार 999 नवे रूग्ण वाढले. एका दिवसात सापडणार्‍या रूग्णांची ही संख्या सर्वात जास्त आहे. यापूर्वी 8 ऑगस्टरोजी 65 हजार 156 नवे रूग्ण सापडले होते. एका दिवसात 942 रूग्णांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. बुधवारी 24 तासात विक्रमी 57 हजार 759 रूग्ण बरे झाले. एका दिवसा बरे होणार्‍या रूग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या 6 लाख 53 हजार 622 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 47 हजार 33 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, दिलासादायक बाब ही आहे की, आतापर्यंत 16 लाख 95 हजार 982 लोक रिकव्हर झाले आहेत.

किती आहे रिकव्हरी रेट आणि डेथरेट?
देशात कोरोनाने होणार्‍या मृत्यूंमध्ये घसरण झाली आहे. मृत्युदर आता घसरून 1.96% झाला आहे. अ‍ॅक्टिव्ह केसचा दर सुद्धा कमी होऊन 27.27% झाला आहे. यासोबतच रिकव्हरी रेट 70.76% झाला आहे. भारतात रिकव्हरी रेट सतत वाढत आहे.

कोरोना प्रभावित प्रमुख राज्यांची स्थिती
बुधवारी सर्वात जास्त महाराष्ट्रात 12,712 नवे रूग्ण सापडले. याच्यासोबतच येथे संक्रमितांचा आकडा वाढून 5,48,313 झाला. 24 तासात झालेल्या 344 मृत्यूंपैकी केवळ मुंबईत 279 लोकांचा मृत्यू झाला. मागील एका दिवसात 13 हजारपेक्षा जास्त लोक बरे झाले.

एका दिवसात या राज्यांमध्ये सर्वात जास्त मृत्यू
मागील 24 तासांत 23 राज्यांमध्ये 941 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 344, तमिळनाडुत 119, कर्नाटक 113, आंध्र प्रदेश 93, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल 54-54, पंजाब 39, गुजरात 18, मध्य प्रदेश 15, दिल्ली 14, राजस्थान 10, बिहार, ओडिशा आणि तेलंगना 9-9, जम्मू कश्मीर 8, असम आणि केरळात 6-6, छत्तीसगढ आणि पुदुचेरी 5-5, उत्तराखंड 4, गोवा आणि हरियाणामध्ये 3-3 मृत्यू झाले. चंडीगढमध्ये एका रूग्णाचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 2.65 कोटीपेक्षा जास्त सॅम्पलची टेस्टींग करण्यात आली आहे.