अमेरिकेने तयार केली आहे का ‘कोरोना’ची लस ? ट्रम्प यांनी केला ‘हा’ दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जग कोरोना विषाणूची लस बनवण्याच्या प्रयत्नात आहे. अमेरिका कोरोना विषाणूची लस बनवण्यासाठी वेगाने प्रयत्न करत आहे. आता अमेरिकेला कोरोना विषाणूची लस बनवण्याच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली. मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, ‘लस आणि उपचारांवर मोठी प्रगती होत आहे.’

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्विट केले होते की, ‘लसीबद्दल चांगली बातमी.’ अमेरिकेत सर्वप्रथम चाचणी केल्या गेलेल्या कोरोना विषाणूची लस मॉडर्ना इंकच्या अगोदर दोन चाचण्यांच्या निकालावरून शास्त्रज्ञ आनंदी आहेत. आता त्यांच्या ताज्या ट्वीटवरून मानले जात आहे की, लसीसाठी सुरू असलेल्या शोधात चांगले यश आले आहे. कोरोना व्हायरस लसीबद्दल अमेरिकेसह जगभरात चाचण्या सुरू आहेत.

भारतातही कोरोना विषाणूची पहिली स्वदेशी लस COVAXIN ची मानवी चाचणी सुरु झाली आहे. नुकतेच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्वीट करून त्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘स्वदेशी कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू झाली आहे. कोरोना विषाणूविरूद्ध युद्ध आता निर्णायक अवस्थेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लसीच्या विकासासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक संकेत आहेत. आपण लवकरच या महामारीवर संपूर्ण विजय मिळवू.’ चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना विषाणू भारत आणि अमेरिकेसह संपूर्ण जगभरात पसरला आहे. कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत सर्वाधिक नुकसान झाले आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमितांची संख्या ३८ लाख ३१ हजार ४०० पेक्षा जास्त झाली आहे, त्यापैकी एक लाख ४० हजार ९०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.