Coronavirus : अमरावतीची व्यक्ती मेरठमध्ये सापडली कोरोना ‘पॉझिटिव्ह’, 4 जणांना केलं ‘संक्रमित’

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील अमरावती येथून मेरठमध्ये गेलेली एक व्यक्ती कोरोना विषाणूची पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर या व्यक्तीच्या संपर्कात आलेले अन्य चार जणांची चाचणीही पॉझिटिव्ह आल्याने मेरठमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

देशभरात लॉक डाऊन जाहीर होण्याच्या अगोदर लाखो लोक मोठ्या शहरातून आपल्या गावी परतले आहेत. लॉक डाऊननंतरही अजूनही शहरामधील रोजगार बंद झाल्याने लाखो लोक आपल्या गावी मिळेल त्या वाहनाने अथवा पायी जात आहे. त्यांच्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव गावांपर्यंत पोहचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमरावतीहून एक जण मेरठ येथे काही दिवसांपूर्वी आला होता. त्याच्यामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसू लागल्याने त्याचे नमूने घेण्यात आले. हे नमूने पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचे नमूने घेण्यात आले. त्यांच्यापैकी ४ जणांचे नमूने पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहेत.

एकाचवेळी पाच जण कोरोना बाधित आढळल्याने मेरठमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या व्यक्तीमुळे मेरठ येथे चौघांना कोरोना विषाणू संक्रमित केला आहे. मात्र, त्याअगोदर तो अमरावती येथे असताना त्याच्या संपर्कात किती जण आले होते. त्यांच्यापासून कोणाकडे कोरोना विषाणू संक्रमित झाला आहे का याची तपासणी झालेली नाही.