Coronavirus : ‘कोरोना’ला ‘मजाक’ मध्ये घेऊ नका ! पाकिस्तानच्या तरूण डॉक्टराचा उपचारादरम्यान मृत्यू (व्हिडीओ)

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – चीन पासून सुरु झालेला कोरोना व्हायरस आता जगभर वेगाने पसरत आहे. १०० हुन अधिक देशांमध्ये याचा फैलाव झाला आहे. शेजारील देश पाकिस्तानातही कोरोनाने दहशत माजवली आहे. तिथे आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात डॉक्टर, नर्स या कोरोनामुळे काही हिरोपेक्षा कमी नाहीत, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. कोरोनावर अद्याप रामबाण उपाय सापडलेला नाहीय. यामुळे कुठे स्वाईन फ्ल्यू, कुठे एड्सवरील औषधे देऊन उपचार केले जात आहेत. अशातही अनेक देशांमध्ये डॉ़क्टरांना वैद्यकीय साहित्य मिळत नाहीय. पाकिस्तानमधील आरोग्यव्यवस्था म्हणावी तशी चांगली नाही. येथील एका डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने एक व्हिडीओ व्हायरल केला होता. ‘कोरोनाला चेष्टेत घेऊ नका ‘! असे त्याने व्हिडिओत म्हंटले होते.

हा डॉक्टर तरुण पाकिस्तानमधील गिलगिट बाल्टीस्तानचा आहे. डॉ. उसमा रियाज असे या डॉक्टरचे नाव असून २६ व्या वर्षीच त्याला मृत्यूने गाठले आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करताना त्याच्याकडे मास्क आणि ग्लोव्हजही नव्हते. तरीही त्याने जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. अखेर त्यालाही कोरोना झाला.

चेष्टेत घेऊ नका

पाकिस्तानी जनतेमध्ये हिरो ठरलेल्या डॉ. उसमा रियाजने मरण्यापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने पाकिस्तानी जनतेला आवाहन केले आहे. कोरोना हा जिवघेणा व्हायरस असून त्याला चेष्टेत घेऊ नका, असे म्हटले आहे. कोरोनाला गंभीरतेने घ्या. तुमचे कुटुंबीय, समाजासाठी घरामध्ये रहा, असे म्हटले आहे.

काय आहे व्हिडीओ ?

व्हिडीओमध्ये डॉक्टर हॉस्पिटलमधील खाटेवर झोपलेला दिसत आहे. त्याला बोलण्यासह त्रास जाणवत होता. मी लोकांना कळकळीने सांगू इच्छितो, की हा व्हायरस हलक्यात घेऊ नका. खायच्या-प्यायच्या मागे लागू नका. तुमच्यामध्ये कोरोनाते लक्षण दिसले तर स्वत:ला घरापर्यंतच बंधक ठेवा. फेसबूक, व्हॉट्स ऍपवर कोरोनाची चेष्टा, टिंगल केली जात आहे. ही चेष्टा नाहीय. मी भाग्यवान आहे की माझ्यावर उपचार सुरु आहेत. हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा, असे आवाहन त्याने केले आहे.

आधी सुविधा पूरवा…

उसमा रियाझचे काम पाहून अमेरिकेनेही त्याच्या बलिदानाची स्तुती केली आहे. तर बाल्टीस्तानच्या मंत्र्याने देशाचा हिरो म्हटले आहे. यावरून उसमाच्या मित्रांनी मंत्र्यांनाच ट्रोल करत आधी सुरक्षा साहित्य उपलब्ध करा, असे सुनावले आहे. पाकिस्तानमध्ये इराणहून परत आलेल्या लोकांना शोधण्याच्या मोहिमेवर रियाझसह अन्य १० जण होते. यावेळी त्यांच्याकडे गरजेचे असलेले मास्क आणि ग्लोव्हजही नव्हते. या प्रवाशांपेकी एका कोरोनाग्रस्तामुळे रियाझलाही कोरोनाची लागण झाली. यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी रियाझने दिवस रात्र कोरोनाच्या रुग्णांची सेवा केली होती.