COVID – 19 : अ‍ॅडम झाम्पा सहित 8 ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या ‘लग्नास’ स्थगिती, ‘कमिन्स’ आणि ‘मॅक्सवेल’च्या लग्नाला देखील होऊ शकतो उशीर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोविड -19 या साथीच्या आजाराचा प्रभाव जगभरातील क्रीडा क्षेत्रावर देखील पडला आहे. या साथीच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक खेळ, युरो चषक आणि इंडियन प्रीमियर लीगसारख्या मोठ्या स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या आहेत आणि आता त्याचा परिणाम क्रिकेटर्सच्या आयुष्यातील वैयक्तिक घटनांवरही होत आहे. ऑस्ट्रेलियाचे असे आठ क्रिकेटर्स आहेत ज्यांना कोविड -19 च्या प्रादुर्भावाने आपले लग्न स्थगित करावे लागले आहे. लिझेल ली आणि तंजा यांचे लग्न स्थगित झाल्यानंतर एकूण आठ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचे लग्न स्थगित होण्याचे वृत्त समोर आले आहे, ज्यात एक नाव अ‍ॅडम झाम्पा चे देखील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यात झाम्पाशिवाय कसोटी वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्ड, डार्सी शॉर्ट, मिचेल स्वीपसन, अ‍ॅलिस्टर मॅकडरमॉट, अँड्र्यू टाय, जेस जोनासन आणि कॅटलिन फ्रेट यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचे वेळापत्रक आणि हवामान परिस्थिती लक्षात घेता बहुतेक लग्न हे एप्रिलमध्ये होतात पण यावेळी असे होणार नाही. ऑस्ट्रेलियामधील बर्‍याच राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. या कालावधीत सार्वजनिक संमेलनांवर बंदी घालण्यात आली आहे, दोन ते पाचपेक्षा जास्त लोक एकाच ठिकाणी एकत्र येऊ शकत नाहीत. लॉकडाऊनच्या नियमांनुसार लग्नात पाचपेक्षा जास्त लोक उपस्थित राहू शकत नाहीत.

ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स हे आणखी दोन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहेत ज्यांना कोविड -19 मुळे लग्नाला उशीर होऊ शकेल. दोघांनाही लग्नाची तारीख निश्चित करायची होती, पण सध्या ते अवघड वाटत आहे. मॅक्सवेलने नुकतीच त्याची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमनशी एन्गेजमेन्ट केली. गेल्या महिन्यात कमिन्सनेही सोशल मीडियावर एन्गेजमेन्टची घोषणा केली होती.