‘कोरोना’ संकटाच्या वेळी प्रत्येक कर्मचार्‍यांना 74000 रुपयांचा बोनस देणार ‘ही’ कंपनी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या संकटात अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्यास सांगत आहेत. त्याचबरोबर फेसबुकने म्हटले आहे की, घरातून काम करण्यात मदत करण्यासाठी ते आपल्या सर्व कर्मचार्‍यांना ७४००० रुपयांचा बोनस देईल. मिळालेल्या माहितीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या कर्मचार्‍यांना पाठवलेल्या अंतर्गत नोटमध्ये याची घोषणा केली. जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार फेसबुकमध्ये सुमारे ४५,००० पूर्णवेळ कर्मचारी आहेत. परंतु या व्यतिरिक्त कित्येक हजार लोक कंत्राटी कामगार आहेत. दरम्यान, करारावर काम करणाऱ्या लोकांना हा बोनस मिळेल की नाही याची माहिती नाही.

मात्र फेसबुकशिवाय इतर टेक कंपन्याही आपल्या कर्मचार्‍यांना बोनस देत आहेत. वर्कडे नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीनेही सोमवारी सांगितले की, ते कर्मचार्‍यांना दोन आठवड्यांचा अतिरिक्त पगाराचा बोनस देतील. त्याचवेळी मंगळवारी फेसबुकने कोरोना विषाणूमुळे पीडित असलेल्या छोट्या छोट्या व्यवसायाला मदत म्हणून ७३९ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. फेसबुक ३० हजार पात्र व्यवसायांना रोख रक्कम आणि जमा देईल.

कोरोना विषाणूमुळे फेसबुकवर परिणाम झाला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये २८ टक्क्यांनी घट झाली आहे. २७ फेब्रुवारी रोजी फेसबुकने आपली वार्षिक सॉफ्टवेअर डेव्हलपर्स परिषद रद्द केली. तर मार्चच्या सुरूवातीपासूनच फेसबुकने आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्यास सांगितले. फेसबुकने अलीकडेच मेडिकल फेस मास्कच्या जाहिरातींवर बंदी घातली होती.

कोरोना विषाणूच्या संसर्गाची एक लाख ८४ हजाराहून अधिक प्रकरणे जगभरात नोंदवली गेली आहेत. डब्ल्यूएचओच्या ताज्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे ७५२९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे सतत वाढत आहेत. आतापर्यंत १५० पेक्षा अधिक संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. देशाच्या विविध भागात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.