COVID-19 : अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट काळ ! 20 वर्ष सुरू असलेल्या व्हिएतनाम युद्धापेक्षा जास्त मृत्यू ‘कोरोना’मुळं

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कोरोना साथीच्या आजाराने त्रस्त झालेल्या अमेरिकेसाठी मंगळवार हा त्यांच्या इतिहासातील सर्वात वाईट दिवस ठरला आहे. जॉन हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये या जागतिक साथीच्या आजारामुळे मृत्यूची संख्या वाढून 58,365 वर गेली आहे, जी व्हिएतनाम युद्धाच्या वेळेपेक्षा जास्त झाली आहे.

20 वर्षांपासून सुरु असलेल्या व्हिएतनाम युद्धामध्ये एकूण 58,220 अमेरिकन लोक मारले गेले होते, परंतु आतापर्यंत तेथे कोरोनामुळे 58,365 अमेरिकन लोक मरण पावले आहेत. अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यात 1955 ते 1975 दरम्यान युद्ध चालू होते, जे गृहयुद्धानंतर अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट संघर्ष असल्याचे सिद्ध झाले होते. परंतु मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत, अमेरिकेने केवळ चार महिन्यांत त्या युद्धापेक्षा जास्त मृत्यूची नोंद केली.

इतकेच नाही तर मंगळवारी अमेरिका जगातील पहिला देश ठरला जेथे कोविड -19 मुळे संक्रमित लोकांची संख्या 10 लाखापेक्षा अधिक झाली आहे. असे असूनही, मृत आणि संक्रमित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, हा अमेरिकेवर एक हल्ला आहे आणि त्याचा सूड देश घेईल. या हल्ल्यात ठोस शत्रू नसले तरी ट्रम्प सतत या जागतिक साथीसाठी चीनवर दोषारोप करीत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरही त्यांच्या निर्णयाबद्दल बरीच टीका होत आहे.