काय सांगता ! होय, ‘व्हायरस’ नष्ट करण्यासाठी प्राध्यापकानं ‘पेपर’ मायक्रोवेव्हमध्ये गरम केले, सर्व उत्तरपत्रिकांची झाली ‘राख’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाची धसका जगभरात घेतला जात असून सोशल मीडियावरील मेसेजमुळे अनेकजण विविध शक्कल लढवित आहेत. अशीच एक शक्कल अमेरिकेमधील एका प्राध्यापकाच्या अंगलट आली आहे. कोरोना व्हायरस नष्ट करण्याासाठी त्यांनी चक्क पेपर मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यामुळे उत्तरपत्रिका जळून खाक झााल्या आहेत. त्यामुळे त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.

टेक्सासमधील एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांनी लिहिलेले पेपर घरी तपासण्यासाठी आणले. मात्र कोरोनाच्या भितीने हे पेपर स्वच्छ करण्यासाठी त्याने चक्क मायक्रोवेव्हचा वापर केला. उच्च तापमानावर कोरोना विषाणू मरतात या समजुतीने प्राध्यापकांनी मायक्रोवेव्हमध्ये पेपर गरम करण्यासाठी ठेवले होते. त्यानंतर काही वेळाने पेपरला आग लागल्याने सर्व पेपर जळून खाक झाले.

यासंदर्भातील एमली पीरिझ विद्यार्थिनीने ट्विट केले आहे. आमच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पेपरवरील कोरोना विषाणू मारण्यासाठी ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्या पेपरला आग लागल्याचे माहिती दुसर्‍या एका प्राध्यापकांनी दिली आहे. माझा याच्यावर विश्वासच बसत नाही, असे एमलीने ट्विट केले आहे.

हे ट्विट व्हायरल झाले असून त्याला 72 हजारहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. संबंधित ट्विटवर 76 हजारहून अधिक जणांनी मत नोंदवले आहे. अनेकांनी या प्राध्यापकाची खिल्ली उडवली आहे तर काहींनी पेपर कसा स्वच्छ करावा याबद्दलची माहिती दिली आहे. मागील महिन्यामध्ये चीनमध्येही असाच प्रकार घडला होता. चीनमधील एका महिलेने चलनी नोटेवरील कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी ती नोट मायक्रोवेव्हमध्ये ठेवली होती. यामुळे 100 युआनची ही नोट जळून खाक झाली होती.