‘बाय डॅडी, त्यांनी माझा व्हेंटिलेटर काढला आहे, आता मी जगणार नाही’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना रूग्णावर उपचार करताना आरोग्य यंत्रणांचा बेजबाबदपणाही समोर येत आहे. हैदराबादमधील अशीच एक घटना घडली आहे. रुग्णालयाने दुर्लक्ष केल्याने 35 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. धक्कादायक म्हणजे, त्यांच्या मुलाने मृत्यपूर्वी रुग्णालयात व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. व्हिडीओतून त्याने आपल्या वडिलांसाठी शेवटचा मेसेज दिला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक संताप आणि आश्चर्य व्यक्त करत आहेत.

तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे 10 खासगी रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्याला अखेर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तरुणाने रुग्णालयात एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यामध्ये तो बोलत आहे की, मला श्वास घेता येत नाही, मी विनंती करुनही त्यांनी गेल्या तीन तासांपासून व्हेंटिलेटर काढला आहे. बाबा मला आता श्वास घेणे शक्य होत नाही. माझे ह्रदय बंद पडले आहे असे वाटतय बाय डॅडी, बाय टू ऑल, डॅडी. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

रुग्णालयात मृत्यू होण्याच्या काही तासांपूर्वीच तरुणाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. माझ्या मुलाने मदत मागितली, पण कोणीही पुढे आले नाही. अंत्यसंस्कार करुन घरी आल्यानंतर मी हा व्हिडीओ पाहिला. यामध्ये तो बाय डॅडी म्हणत आहे, असे तरुणाच्या वडिलांनी सांगितले आहे. माझ्या मुलासोबत जे झाले ते इतर कोणासोबत होऊ नये. माझ्या मुलाला ऑक्सिजन का दिला गेला नाही? इतर कोणाला इतकी गरज होती का, की त्याच्यासाठी माझ्या मुलाचा ऑक्सिजन काढण्यात आला? मुलाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत, अशा भावना वडिलांनी व्यक्त केल्या आहेत.