Coronavirus : धक्कादायक ! महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितानं ब्लेड मारून घेऊन केली आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शहरातील सर्वोपचार रुग्णालयातील अलगीकरण (आयसोलेशन) कक्षात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने गळ्याला ब्लेड मारून स्वतःला गंभीर जखमी करून घेतले. त्यानंतर उपचारादरम्यान त्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.

मोहम्मद जहरुल इस्लाम असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ते मूळचे सालपडा जि. नागाव,आसाम येथील रहिवासी होते.

अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना संसर्गित रुग्ण म्हणून मोहम्मदला 7 एप्रिलला दाखल केले होते. आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत मोहम्मद बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आले. रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी सांगितले.

दरम्यान, जगभरात थैमान घालणार्‍या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. मागील चोवीस तासात देशभरात कोरोनाचे 40 बळी गेले आहेत. तब्बल एक हजार 35 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 7 हजार 447 वर पोहचला आहे.