Coronavirus : राज्यातील मालवाहू ट्रक वाहतुकीला परवानगी, ‘कम्युनिटी किचन’चा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थातच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे जागोजागी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना संबंधित घटनास्थळी पोहोचण्यासाठी ट्रक वाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. ज्यामुळे राज्यातील मालवाहू ट्रक वाहतूक पुन्हा सुरु होणार आहे. त्यांनतर आता जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून अडविण्यात येणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकी दरम्यान संबंधित निर्णय घेण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस महासंचालक सुबोधकुमार, मुख्य सचिव अजोय मेहता, तसेच संबंधित विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करत निर्णय घेण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेती वापराचे ट्रॅक्टर, हार्वेस्ट्रर आदी वाहनांना पुरेसे पेट्रोल, डिझेल उपलब्ध करुन देण्या संदर्भातील निर्णयावरही शिक्कामोर्तब झाली आहे. तसेच शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरीब नागरिक, रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक यांच्यासाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने ‘कम्युनिटी लंगर’ सुविधा सुरु केली आहे. यासोबतच खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने राज्यातल्या अन्य शहरात देखील ‘कम्युनिटी किचन’ सुरु करण्यात यावेत तसेच नागरिकांना ‘रेडी टू इट’ किंवा ‘रेडी टू कूक’ अन्नपदार्थ उपलब्ध करुन द्यावेत असा महत्वपूर्ण निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रसरकारकडून जाहीर केलेल्या १ लाख ७० हजार कोटी मदत पॅकेजचे तसेच अन्य उपाययोजनांचेही स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.