Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 629 नवीन रुग्ण, 900 कोरोनामुक्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरात 900 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरामध्ये आज दिवसभरात 629 रुग्णांची कोरोनाची चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवसभरात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 505 वर पोहचली आहे. पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 629 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 24 हजार 311 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले 629 रुग्ण हे शहरातील आहेत. आज शहराबाहेरील एकही रुग्ण आढळून आला नाही. शहराबाहेरील 316 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 49 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 16 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 13 रुग्ण शहरातील आहेत तर 3 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 505 वर पोहचला आहे. यामध्ये 408 रुग्ण शहरातील तर 97 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 900 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 17 हजार 106 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 3783 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये आकुर्डी, चिंचवड, निगडी, कासारवाडी, पिंपळे गुरव, भोसरी, काळेवाडी, इंद्रायणीनगर, मोशी, सांगवी, तळेगाव दाभाडे, देहूरोड, म्हाळुंगे येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.