Coronavirus : पोलिसांनी WhatsApp Admins साठी केली ‘ही’ महत्त्वाची सूचना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 503 वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या 107 वर पोहचली आहे. कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशातील 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात असून 30 राज्ये सध्या लॉकडाऊन आहेत. तर महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

एकिकडे सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना आखल्या जात आहेत. तर दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अनेक अफवा पसरवल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिन्सला एक महत्त्वाची सूचना केली आहे.

कोल्हापूर पोलिसांच्या ट्विटर हँण्डलवरून व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमीन्स यांनी काय खबरदारी घ्यावी यासंदर्भात एक ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये सर्व ग्रुप अ‍ॅडमीनने नोंद घ्या, की व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूकवरून अफवा पसरविल्या जात आहेत. तरी सर्व ग्रुप अ‍ॅडमीनने आपल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये जाऊन Only Admin अशी सेटिंग करुन घ्यावी. असे पोलिसांनी या ट्विटमध्ये सांगितले आहे. तसेच ही सेटींग करून आपण सर्वजण मिळून अफवांचा प्रसार थांबवूयात असे आवाहन देखील पोलिसांनी या ट्विटमधून केले आहे.