Coronavirus : पोलिस दलातील ‘कोरोना’चा तिसरा बळी, वाहतूक विभागातील 56 वर्षीय कॉन्स्टेबलचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आज मुंबई पोलीस दलातील 56 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे मुंबई पोलीस दलातील मृत पोलिसांचा संख्या तीन झाली आहे. या पोलीस कॉन्स्टेबलवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत पोलीस कर्मचारी कुर्ला वाहतूक विभागात कार्यरत होते.
मृत पोलीस कर्मचाऱ्याची अचनाक तब्येत बिघडली. अंग तापाने फणफणु लागल्याने कुटुंबाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची धडपड सुरु केली. कोरोना संशयित असलेल्या या पोलिसाला राजावाडी ते कस्तुरबा, कस्तुरबा ते नायर आणि नायर ते केईएम करत अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कुर्ला वाहतूक विभागात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असणाऱ्या शिपायाला 20 तारखेला घरात असताना ताप आला. ताप वाढल्याने त्यांनी खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले. मंगळवारीही ताप कमी न झाल्याने मुलाने त्यांना दुपारच्या सुमारास राजावाडी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये घेउन जाण्यास सांगितले. मुलाने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात घेऊन गेला मात्र, तेथील डॉक्टरांनी बेड शिल्लक नसल्याचे सांगत त्यांना नायर रुग्णालयाचा मार्ग दाखवला. मुलाने विनंती करूनही त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. अखेर मुलाने नायर रुग्णालयाकडे धाव घेतली. नायर रुग्णालयाने दखील तेच कारण सांगून केईएमचा रस्ता दाखवला.

मुलाने रात्री नऊच्या सुमारास आशेने केईएम रुग्णालय गाठले. मात्र, तेथील डॉक्टरांनीही नकार देत कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितले. याबाबत मुलाने कुर्ला वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणदिवे यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी देखील नियंत्रण कक्षाद्वारे याबाबत मदत मागत होते. अखेर भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांना फोन करुन याबाबत कारवाई करण्यास सांगण्यात सांगितले. कांबळे यांनी हस्तक्षेप करून रुग्णालयातील अधिकाऱ्यांना पोलीस शिपायास दाखल करुन घेण्यास सांगितले. आणि नंतर तासाभराने रात्री 10 च्या सुमारास त्यांच्यावर उपचार सुरु झाले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.