Coronavirus : राज्यातील ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या 40, एकाची प्रकृती गंभीर, CM ठाकरेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 40 झाली आहे. दुर्दैवानं यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 40 झाली आहे. दुर्दैवानं यातील एका रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या या रुग्णांमध्ये 26 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहेत. सर्वांचीच तब्येत खूप वाईट आहे अशातला काही भाग नाही. एका रुग्णाची परिस्थिती काहीशी गंभीर आहे. बाकी इतर रुग्णांची प्रकृती मात्र स्थिर आहे.”

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आजही आम्ही बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. परंतु माझं आवाहन आहे की अनावश्यक प्रवास सर्वांनी टाळायला हवा. गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरातून बाहेर पडू नका.” असं आवाहनही त्यांनी केलं.