3 हॉस्पीटलनं दिला नकार, आईनं आत्महत्येची धमकी दिल्यानंतर चौथ्या रूग्णालयात भरती, ‘कोरोना’मुळं झाला मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने उच्छाद मांडला आहे. अशा परिस्थितीत देशातील रुग्णालयांमध्ये कोरोना संक्रमित लोकांच्या उपचारांसाठी पूर्ण व्यवस्था केल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु असे असूनही काही लोकांना उपचार मिळत नाहीये, ज्याची किंमत त्यांना त्यांच्या मृत्यूने मोजावी लागते. कोलकातामध्ये असे एक प्रकरण समोर आले आहे. तिथे बारावीत शिकणार्‍या 18 वर्षाच्या विद्यार्थ्याचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. त्याला उपचारासाठी 3 रुग्णालयांनी प्रवेश नाकारला, असा आरोप कुटुंबियांनी केला. यानंतर जेव्हा त्याच्या आईने आत्महत्येची धमकी दिली तेव्हा चौथ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

18 वर्षीय सुब्रजित चट्टोपाध्याय हा 12 वीचा विद्यार्थी होता. त्याला मधुमेहही होता. त्यांनतर तो कोविड – 19 संक्रमित झाला. त्याच्या कुटुंबीयांचा आरोप केला कि, त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तीन रुग्णालयांनी त्यांची नोंद घेण्यास नकार दिला. त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी रात्री त्याच्या आईने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने त्याला कोलकता मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याचा मृत्यू झाला.

आरोग्य सेवा संचालक अजय चक्रवर्ती म्हणाले की, या प्रकरणाकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचवेळी विद्यार्थ्याचे वडील म्हणाले, ‘मुलाला मधुमेह होता. शुक्रवारी सकाळी त्याला श्वास घेण्यात त्रास होत होता. यानंतर आम्ही त्याला ईएसआय रुग्णालयात नेले. पण तिथे त्यांनी म्हंटले की, त्यांच्याकडे कोणताही आयसीयू बेड उपलब्ध नाही. ‘ईएसआय रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिल्यावर आम्ही त्याला एका खासगी नर्सिंग होममध्ये नेले. तेथे त्याची कोविड – 19 चाचणी करण्यात आली. जेव्हा अहवाल सकारात्मक आला तेव्हा बेड उपलब्ध नसल्याचे सांगत नाव नोंदणीस नकार दिला गेला. यावेळी आम्ही रुग्णवाहिकेत थांबलो होतो. विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, “आम्ही मुलाला सरकारी सागर दत्ता रुग्णालयात नेले होते. आम्हाला तिथेही नकार देण्यात आला. यानंतर आम्ही पोलिसांकडे गेलो, तेव्हा पोलिसांनी आम्हाला केएमसीएचमध्ये जाण्यास सांगितले. तिथे मी आत्महत्येची धमकी दिली असता रुग्णालयाने त्याला भरती केले.

वडील म्हणाले, ‘माझ्या मुलाला रुग्णालयात कोणतेही औषध दिले जात नव्हते. त्याला एका वॉर्डात नेण्यात आले जेथे आम्हाला प्रवेश नव्हता. आम्ही सतत त्याचे आरोग्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो, पण कोणीही त्याबद्दल आम्हाला सांगत नव्हते. जेव्हा आम्ही चौकशी काउंटरवर गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की रात्री 9.30 च्या सुमारास मुलाचा मृत्यू झाला. ते म्हणतात की जर रुग्णालयात मुलाला योग्य वेळी दाखल केले असते, तर मुलाचा मृत्यू झाला नसता.