Coronavirus : औषधे आणि लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले महत्वाचे आदेश

नवी दिल्ली – वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी देशातील औषधांची टंचाई आणि लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. तर राज्यांनी कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नये अशा सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत. बैठकीदरम्यान मोदींना प्रत्येक राज्यातील कोरोनाबाबतच्या स्थितीची माहिती देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज घेण्यात आलेल्या मोदींच्या या महत्वाच्या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी त्वरित आणि समग्र उपाय सुनिश्चित करण्यासाठीच्या उपायांवरही चर्चा झाली. बैठकीदरम्यान मोदींनी म्हटले की, राज्यांना अशा जिल्ह्यांची ओळख पटवण्याचा सल्ला देण्यात आला होता जिथे पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांहून जास्त आहे आणि प्राणवायू समर्थित अथवा ICU बेड ६० टक्क्यांहून जास्त भरलेला आहे. तसेच यावेळी मोदींनी औषधांच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला. त्यांना रेमडेसिवीरसह इतर औषधांच्या उत्पादनात वेगाने होत असलेल्या वाढीबाबत माहिती दिली. मोदींनी आगामी काही महिन्यांमध्ये लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी लसीकरण आणि त्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे.

या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी राज्यांमध्ये होल असलेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. ४५ वर्षांवरील जवळपास ३१ टक्के लोकांना कोरोना लसीचा किमान एक डोस दिला गेला आहे. लसीकरणाची गती कमी होता कामा नये यासाठी राज्यांना सूचना दिली गेली पाहिजे. तसेच लॉकडाऊन असले तरी नागरिकांना लसीकरणाची सुविधा दिली गेली पाहिजे. तर लसीकरणाचे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना इतर कामांकडे वळवता कामा नये. असे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे.

पीएमओच्या माहितीनुसार, राज्यांना आतापर्यंत १७.७ कोटी लसी पाठवण्यात आले. पंतप्रधान मोदीसमोर भारतातील वेगवेगळ्या राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाचे व्यापक चित्र मांडण्यात आले. तसेच, १ लाखांहून अधिक अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण असलेल्या बारा राज्यांची माहिती दिली आहे. तर जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांबाबतही माहिती दिली. तसेच, पंतप्रधानांना राज्यांकडून उभारण्यात आलेल्या पायाभूत आरोग्य सुविधांची देखील माहिती देण्यात आलीय. यावेळी आरोग्य सेवांच्या पायाभूत चौकटीत सुधारणा करण्यासाठी राज्यांना मदत आणि मार्गदर्शन केले गेले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.