Coronavirus : ‘सार्वजनिक’ प्रवासी ‘वाहूतक’ लवकरच ‘सुरु’ करण्याचे नितीन गडकरींचे ‘संकेत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशासमोरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना थांबलेल्या अर्थचक्राला गती देण्याचे काम सध्या केंद्राकडून केले जात आहे. सरकारकडून उद्योगधंद्यांना काही निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे. आता गेल्या दीड महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली सार्वजनिक प्रवासी वाहतूक नियमावलीसह परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी तसे संकेत दिले आहेत.

सार्वजनिक प्रवास वाहतूक लवकरच सुरु होऊ शकते. त्यासाठी नियमावली तयार केली जात असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. बस आणि कार वाहतूकदरांच्या संघटनेला संबोधित करताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. सध्या केवळ ग्रीन झोनमधील बस आणि कारला वाहतुकीला करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त एका हिंदी वृत्तपत्राने दिले आहे.

वाहतूक आणि महामार्ग खुले करणे हा सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकते. मात्र, बस आणि कारमधून वाहतूक सुरु झाल्यानंतर स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य असले, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. गडकरी पुढे म्हणाले की, वाहन मालकांच्या समस्यांची मला जाणीव आहे आणि त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी हरप्रकारे मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच संधीमध्ये रुपांतर करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.