पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज 17 मार्चपासून केवळ 3 तास सुरू राहणार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज उद्यापासून (मंगळवार) केवळ तीन तास सुरू राहणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हे काम असणार आहे. जामीन, अटपूर्व जामीन, रिमांड आणि दिवाणी मध्ये मनाई आदेश यावरच सुनावणी होणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून उच्च न्यायायाने पुढील आदेश येई पर्यंत शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने केवळ तीन तास न्यायालयाचे कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच न्यायायातील कॅन्टीन सुद्धा याच वेळेत उघडे राहणार आहेत. अती महत्त्वाच्या प्रकरणांत सुनावणी होणार आहे.

पक्षकारांनी गरज असेल, तरच न्यायालयात यावे. वकिलांनी पक्षाकारांना बोलवू नये, असा निर्णय प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.पी.धोटे आणि पुणे बार असोसिएशन यांच्यात झालेल्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला आहे.

येरवडा कारागृहातील बंदींना व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर करण्याबाबतचाही निर्णय यावेळी घेण्यात आले असल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष सतीश मुळीक यांनी सांगितले. नागरिकांनी सुनावणीबाबत कोणतीही भीती बाळगू नये, असे ते म्हणाले.