Coronavirus : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना हॉस्पीटलमधून ‘डिस्चार्ज’, डॉक्टरांनी दिल्या ‘या’ सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना तपासणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. स्वत: महापौरांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटर अकाउंटवरुन दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांच्यात कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे महापौर मुरलीधर मोहोळ यांना आज (गुरुवार) रुग्णालय प्रशासनाने घरी सोडले आहे.


महापौर मुरलीधर मोहोळ यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शनिवारी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये काही जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र आता मोहोळ यांना रुग्णालयाने घरी सोडले असले तरी त्यांना 15 जुलैपर्यंत होम क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून आपल्याला डिस्चार्ज दिल्याची माहिती दिली आहे. कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. येत्या 15 तारखेपर्यंत होम क्वारंटाईन राहण्याची सूचना डॉक्टरांकडून मिळाली आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमेचे मन:पूर्वक धन्यवाद ! होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा 24 तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असले, याचं नक्कीच समाधान आहे, असे आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.